नवी दिल्ली. धर्मेन्द्रसिंह भदौरिया लाॅकडाऊनमुळे मार्च महिन्यात आॅनलाइन व्यवहारांमध्ये घसरण झाली आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये यूपीआय आणि भीम अॅपच्या माध्यमातून हाेणारे व्यवहार जवळपास १६,०५५ काेटी रुपयांनी कमी झाले आहेत. या व्यवहारांच्या प्रमाणात ८ काेटींनी घट झाली असल्याचे नॅशनल पेमेंटस् काॅर्पाेरेशन आॅफ इंडियाचे (एनपीसीआय) मुख्य कामकाज अधिकारी प्रवीण राय यांनी सांगितले. सर्व व्यावसायिक आस्थापना बंद असून लाेक घरी आहेत. त्यामुळे आयएमपीएस आणि आधार यावर आधारित पेमेंट सिस्टिमच्या (एआयपीएस) माध्यमातून हाेणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण कमी झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फिनटेक कन्व्हर्जन कौन्सिलचे अध्यक्ष नवीन सूर्या म्हणाले, देशात काेराेनामुळे १५ मार्चनंतर या व्यवहारात थाेडी फार घट झाली हाेती, परंतु २५ मार्च राेजी लाॅकडाऊनची घाेषणा झाल्यानंतर ही घसरण जास्त झाली आहे. एप्रिलमध्ये त्यात अणखी घसरण हाेईल, पण भविष्यात डिजिटल व्यवहारात अणखी वाढ हाेण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
व्यक्तिगत घट, पण किराणा व्यवहारात ५ टक्के वाढ
व्यक्ती ते व्यक्ती हाेणाऱ्या रकमेच्या व्यवहारात घट झाली आहे, परंतु खाद्य व किराणा गटात व्यक्तींकडून व्यापाऱ्यांना हाेणाऱ्या (पर्सन टू मर्चंट) रक्कम व्यवहारात ६ % वाढ झाली आहे. भाजी दुकान, पेट्राेल पंप, रेस्तराँ, ई- काॅमर्स आणि देयक भरणा आदींना स्मार्टफाेनच्या माध्यमातून चालना देण्यासाठी ‘यूपीआय चालेल’ माेहीम सुरू केली असल्याचे राय यांनी सांगितले.